जळगाव - जिल्ह्यातील काही भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी पावसासोबत गारपीटदेखील झाली आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीवर आलेला रब्बी हंगामातील गहू तसेच मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
हेही वाचा... कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत, नगर पालिका निवडणूक प्रक्रिया स्थगित
जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 5च्या सुमारास जिल्ह्यातील जामनेर, भुसावळ, बोदवड तसेच मुक्ताईनगर तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये गारपीटदेखील झाली. या पावसामुळे गहू, हरभरा तसेच मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा... CORONA VIRUS : पोलिसांकडून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' तपासणी बंद, महासंचालकांचे आदेश
यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच उत्पन्न आले नव्हते. त्यानंतर शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती. परंतु रब्बीच्या अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.