जळगाव - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वमान्य असा निकाल दिला आहे. या निकालात कुणाचाही विजय किंवा कुणाचा पराभव झालेला नाही. हा ऐतिहासिक असा निकाल आहे, अशा शब्दात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयापुढे मोठा गहन प्रश्न होता. या निकालामुळे सर्वच पक्षांना निश्चित असे समाधान मिळेल. कारण सर्वमान्य निकाल असल्याने कोणालाही आपला पराभव झाला असे वाटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली आहे, असेही निकम यांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सर्वांनी मिळून स्वागत केले पाहिजे. कोणीही अफवांना बळी पडू नये. आपल्या देशात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असेही आवाहन यावेळी उज्ज्वल निकम यांनी केले.