जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे एका अट्टल दुचाकी चोराचे नाव समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका पंटरच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचुन या दुचाकीचाेरास अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जमील अय्युब शेख (वय २४, रा. वाळुज एमआयडीसी, औरंगाबाद, मुळ रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे.
जामनेर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या होत्या. दरम्यान, या परिसरात जमील नावाचा तरुण दुचाकी चोरुन नंतर औरंगाबाद जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कर्मचारी विजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवाना पाटील, सचिन महाजन व इशान तडवी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने एका पंटरच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचला. त्यानंतर जमील शेख याने दुचाकी देण्याचे मान्य केले. हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक तेथे रवाना झाले. जमील याने चोरीची दुचाकी पंटरकडे देताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
![अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-04-duchaki-chori-ughad-mh10027jpg_05112020212645_0511f_1604591805_530.jpg)
दुचाकी चोरीचे रॅकेट?
आरोपी जमील शेख याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी पोलिसांच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यात एखादे रॅकेट सक्रिय असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.