जळगाव - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याच्या नैराश्यातून जळगावात बुधवारी (दि. 1 जुलै) दोघांनी आत्महत्या केली. त्यात रितेश उर्फ राजू सुरेश पाटील (वय 23, रा. वडली, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन तर लहू कौतिक पाटील (वय 70, रा. लोणवाडी, ता. जळगाव) या वृद्धाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपवली.
वडली येथे रितेशने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या देवराम महाराज मंदिराच्या मागे लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. राजू हा वाहन चालक होता. ट्रॅक्टर, चारचाकी, मालवाहू वाहनांवर रोजंदारीने तो चालकाचा काम करत होता. मात्र, तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे त्याला काम मिळत नव्हते. कायमस्वरुपी रोजगार नाही, आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची. वडील व मोठ्या भावाचेही काम थांबले होते. या नैराश्येतून त्याने टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.
धावत्या रेल्वेखाली झोकून वृद्धाने केली आत्महत्या
लोणवाडी येथील लहू पाटील हे मंगळवारपासून (दि. 30 जून) बेपत्ता होते. म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहू पाटील यांची परिस्थिती देखील जेमतेम होती. त्यांचा मुलगा अनिल हा सुरत येथे परिवारासह राहतो. तर मोठा मुलगा भाऊसाहेब हा सासरवाडीला बुलढाणा जिल्ह्यातील खांडवा येथे वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही घटनांची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा - पिकांच्या संरक्षणासाठी शिक्षकाने बनवली अनोखी तोफ...