जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ येथील अजून दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात भुसावळ शहरातील एक महिला आणि एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 43 वर पोहचली आहे.
जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 2 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही व्यक्तींचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही व्यक्ती भुसावळच्या रहिवासी असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43 झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
अमळनेर पाठोपाठ भुसावळही झाले 'हॉटस्पॉट'
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अमळनेर पाठोपाठ आता भुसावळ शहरही कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. भुसावळात दररोज कोरोनाचे बाधित रुग्ण समोर येत आहेत. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे.