जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल असलेल्या 2 संभाव्य रुग्णांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांच्या कोरोना चाचणीचे तपासणी अहवाल येणे बाकी असून अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना विशेष कक्षात दाखल असलेल्या 2 संभाव्य कोरोना रुग्णांचा शनिवारी रात्री 10 ते 10.15 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यात शहरातील खोटेनगर परिसरातील एक 65 वर्षीय महिला तर वाल्मिकनगरमधील 33 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही दोघांच्या मृत्यूबाबत दुजोरा दिला आहे.
या दोन्ही रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 3 वर जाईल. या आधी एका 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती शहरातील सालार नगरातील रहिवासी होता. आता मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींच्या ट्रॅव्हल्स हिस्ट्रीबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही.