जळगाव - शहरात आत्तापर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून 49 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेली वृद्ध व्यक्ती शहरातील सालारनगरची रहिवासी होती. ते फळे विक्री करणारे घाऊक व्यापारी होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा कुठलीही प्रवास इतिहास नसतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जळगाव शहरात मेहरून आणि सालारनगर हे परिसर कोरोनाग्रस्त भाग आहेत. मेहरूनमध्ये 28 मार्चला जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळला. येथील 49 वर्षीय व्यक्तीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर 2 एप्रिलला सालारनगरात 63 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. खबरदारी म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दोन्ही परिसर सील केले.
मेहरूनमधील रुग्णाच्या नातेवाईकांसह 40 जणांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महापालिका प्रशासनाने या परिसरातील 14 हजार घरांचे सर्वेक्षण केले आहे. हा परिसर दररोज निर्जंतुक केला जात आहे.
सालारनगरमध्येही कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांसह 18 जणांना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्याही चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याही परिसरातील 8 हजार घरांचे सर्वेक्षण केले असून दररोज निर्जंतुकीकरण केले जात आहे.