जळगाव- जिल्ह्यातील भुसावळ शहरातील डॉ. सिनीन मशहूद रजा सैय्यद यांच्या घरी मागील आठवड्यात झालेल्या 11 लाख रुपयांच्या घरफोडीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील जवळपास 3 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त केली आहे.
आकाश सुरेश मोरे (वय 25, रा. घोडेपीर नगर, भुसावळ) आणि या गुन्ह्यातील चोरीचे पैसे जवळ बाळगणारा संशयित आरोपीचा बाप शेख महेमूद शेख इमाम (रा. दीनदयाळ नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. डॉ. सिनीन मशहूद रजा सैय्यद यांच्या घरात आकाश मोरे त्याचे साथीदार शेख दाऊद शेख महेमूद (रा. दीनदयाळ नगर, भुसावळ), अनिस शेख रशीद (रा. जाम मोहल्ला, भुसावळ), अल्तमस शेख रशीद (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) आणि जहीर (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांनी मिळून घरफोडी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
भुसावळ शहरातील डॉ. सिनीन मशहूद रजा सैय्यद यांचे रजा नगरात खुशतर हाऊस नावाचे घर आहे. भुसावळ शहरात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे सिनीन यांच्या नातेवाईकांचे विलगीकरण करण्यात आले होते. ही संधी साधून आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. घरातून त्यांनी 4 लाख रुपये रोख तसेच सोने-चांदीचे दागिने इतर वस्तू असा एकूण सुमारे 11 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना समोर आल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठवडाभरातच या घरफोडीचा उलगडा केला आहे. या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत
.