जळगाव - शहरातील घाणेकर चौकात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू असताना वादाचा प्रकार घडला आहे. या कारवाईवेळी अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत हुज्जत घालत अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या दोन हॉकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फारूक शेख यासिन व शेख तौफिक फारूक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
शहरातील अनधिकृत होर्डिंगसह ठिकठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई पालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. शहरातील शनिपेठ भागात अशीच कारवाई सुरू असताना शेख फारूक व शेख तौफिक यांनी पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक्रमण पथकाने अनेक अतिक्रमणधारक हॉकर्सचे साहित्य जप्त केले. यावेळी काही जणांकडून विरोध होत असल्याने वाद वाढत गेला. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसांना सूचना देण्यात आल्या. यावेळी शेख फारूक व शेख तौफिक यांनीही पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली. यानंतर पालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर तुकाराम कोळी यांनी केलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात पालिकेने शहरात होर्डिंग्ज लावण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. शहरात लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढण्यात आले. तसेच जाहिरात करणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - फेसबुकवर प्रेमाच्या आणाभाका; जळगावाच्या विवाहितेने यूपीच्या प्रियकरासोबत गाठली नेपाळची सीमा