भुसावळ (जळगाव)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम १ ते १६ सप्टेंबर या काळात सुरू केली. विनातिकीट प्रवास आणि इतर कारणांसाठी १३३८ प्रवाशांकडून तिकीट तपासणी पथकाने १२ लाख १६ हजार २७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.आगामी काळातही रेल्वे तिकीट तपासणीच्या मोहिमेत सातत्य राखले जाणार आहे.
विशेष मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १०४४ प्रवाशांकडून ८ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तिकिटांच्या बदलीप्रकरणी २४ प्रकरणात प्रवाशांकडून ६१ हजार रुपये दंड वसूल केला. ज्येष्ठ नागरिक सुविधेचा गैरवापर केल्याने १७७ जणांकडून २ लाख २० हजार रुपये, कमी श्रेणीतील तिकीट घेत वरच्या श्रेणीच्या डब्यात बसून प्रवास करणाऱ्या ७५ प्रवाशांकडून १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विशेष रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणारे आणि तिकीट न काढतात प्रवास करणाऱ्यांविरुद्ध भुसावळ विभागाकडून कारवाई करण्यात आली. विशेष तिकीट तपासणी पथकाने भुसावळ-खंडवा, भुसावळ-नाशिक आणि भुसावळ-अकोला या मार्गांवर तपासणी केली. काही प्रवाशांकडे तिकीट खिडकीवरून काढलेले तिकीट सोबत नव्हते. त्यांनी आपल्या मोबाइलवर तिकिटाचे फोटो दाखवले. परंतु, असे तिकीट वैध ठरत नसल्याने तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना दंड केला.
वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरूणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्यासह १५ जणांनी भुसावळ विभागात तिकीट तपासणी मोहीम राबवली. आगामी काळातही रेल्वे तिकीट तपासणीच्या मोहिमेत सातत्य राखले जाणार आहे.