जळगाव - परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रक रविवारी दुपारी जळगावातील प्रभात चौकात जिल्हापेठ पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये 45 मजूर होते. ते नाशिक येथून उत्तरप्रदेशात निघाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मजुरांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रविवारी दुपारी जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक महामार्गावर गस्त घालत होते. याचवेळी एक ट्रक संशयास्पदरित्या जाताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून हा ट्रक महामार्गावरील प्रभात चौकात पकडला. या ट्रकमध्ये 45 परप्रांतीय मजूर होते. सर्वांची सखोल चौकशी केली असता ते नाशिक येथून उत्तरप्रदेशात आपल्या घरी जात होते. नाशिक येथून पायी चालत असताना पुढचे अंतर कापण्यासाठी ते या ट्रकमध्ये बसले होते. या मजुरांकडे कोणतीही परवानगी नव्हती. शिवाय ते सर्व जण एकाच ट्रकमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळता बसलेले होते. अशात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती होती.
सर्व मजुरांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी स्क्रिनिंग वॉर्डात सर्वांची तपासणी करण्यात आली. नंतर सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले. याप्रकरणी मजुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याने ट्रक चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली.