जळगाव - शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या खुनाप्रकरणी आज आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुकेश सपकाळे या विद्यार्थ्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
जळगावात काही दिवसांपूर्वी मूळजी जेठा महाविद्यालयात 6 गुंडांनी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुकेश सपकाळे या विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला केला होता. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे विद्यार्थीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीला आळा बसणे गरजेचे आहे. सपकाळे या विद्यार्थ्याच्या मारेकऱ्यांना फासीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे करण्यात आली.
मुकेश सपकाळे या विद्यार्थ्याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. तसेच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. शाळा आणि महाविद्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्यावतीने विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. प्रशासनाने मागण्यांची दखल घेतली नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.