जळगाव - रुळावरून धावणाऱ्या रेल्वेसमोर कोणी आले तरी लोको पायलटला ती त्याच वेगाने पुढे न्यावी लागते. एका जीवापेक्षा हजारोंचे प्राण महत्त्वाचे मानत रेल्वे पुढे निघून जाते. मात्र, रेल्वेच्या बाबतीत जळगाव जिल्ह्यात याच्या अगदी उलट प्रकार घडला आहे. रेल्वेतून पडून जखमी झालेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे थांबवण्यात आली. एवढेच नव्हे तर ती चक्क दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत उलटी धावली. देवळाली-भुसावळ पॅसेंजरच्या बाबतीत गुरुवारी हा प्रकार घडला आहे.
पाचोरा रेल्वे स्थानकावरून राहुल पाटील नामक तरुण देवळाली-भुसावळ या पॅसेंजरमध्ये (गाडी क्रमांक 51181) जळगावला येण्यासाठी बसला. गाडीत गर्दी असल्याने आतमध्ये जागा नव्हती. म्हणून राहुल दरवाजाजवळच उभा होता. दरम्यान त्याचा तोल गेल्याने तो परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान पोल नंबर 383 च्या जवळ खाली पडला. ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ साखळी ओढून गाडी थांबवली. तोपर्यंत गाडी दीड ते दोन किलोमीटर अंतर पुढे गेली होती. रेल्वेतून पडून तरुण जखमी झाल्याने त्याचे प्राण वाचविण्यासाठी रेल्वे मागे घेण्यात आली. राहुल जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता.
हेही वाचा - भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
अन् मालगाडीही थांबविली -
शटल थांबविल्यानंतर प्रवाशी राहुलला उचलण्यासाठी गेले असताना दुसऱ्या ट्रॅकच्या अपलाईनवरून जाणारी मालगाडी देखील थांबविण्यात आली. यावेळी शटलचे गार्ड यांनी मालगाडी चालकास जखमीला पाचोऱ्यापर्यंत नेण्याची विनंती केली. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जळगाव येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून त्याला वेळेत उपचार मिळाले तर तो वाचू शकेल, असा संदेश लोको पायलट दिनेश कुमार यांना देण्यात आला. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता माणुसकीच्या नात्याने रेल्वे मागे घेतली.
हेही वाचा - जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे वर्षभरात 30 हजार वाहनधारकांवर कारवाई
गार्ड व लोको पायलट यांचा संवाद -
तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी गार्ड व रेल्वेचे लोको पायलट यांनी चर्चा करून रेल्वे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मागे नेत जखमी राहुलला गाडीत टाकले. या जखमी तरुणाला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. अनेक प्रवाशांनी पहिल्यांदाच गाडी उलटी जात असल्याचे अनुभवले. रेल्वे प्रशासनाने जखमी व्यक्तीसाठी लागलीच गाडी पुन्हा मागे घेत माणुसकीची दाखविल्याची चर्चा रंगली होती.