जळगाव - वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळल्याने ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. ही घटना आज (सोमवारी) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगाव तालुक्यातील मोहाडीजवळ घडली. विनोद महारू मालचे (वय 36, रा. मोहाडी, ता. जळगाव), असे या मृत चालकाचे नाव आहे.
विनोद मालचे हा जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या भैय्या नाईक यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होता. सोमवारी तो नागझिरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अपूर्ण क्रमांक असलेल्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून जळगावकडे येत होता. मोहाडीजवळ रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. याठिकाणी पुलाच्या बेसमेंटसाठी खोदकाम केलेले आहे.
हेही वाचा - 'वाडिया'ला जीवनदान द्या; कर्मचारी आणि कामगार युनियनचे रुग्णालयाबाहेर धरणे
या कामाच्या ठिकाणी चालक विनोदचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर बेसमेंटच्या खड्ड्यात कोसळले. त्यात विनोदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पुलाच्या कामावर असलेल्या कामगारांनी धाव घेतली. मात्र, अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विनोदचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हेही वाचा - 'त्या' पुस्तकावर तत्काळ बंदी घाला; अन्यथा....., संभाजी ब्रिगेडचा इशारा
दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या विनोदच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि 2 वर्षांची चिमुरडी, असा परिवार आहे. या घटनेमुळे अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.