जळगाव - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 (अ) हटविण्यात आले आहे. त्यामुळे आपला देश एकसंघ झाला असून, हा एकसंघ देश म्हणून आपण आज पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
कलम 370 आणि कलम 35 (अ) मुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता. त्यामुळे त्याठिकाणी पाकिस्तानच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होत होत्या. आपला झेंडा त्याठिकाणी फडकवणे देखील शक्य नव्हते. काश्मीर आपले आहे किंवा नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, आज काश्मीरला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे आपला भारत एकसंघ झाला आहे. आज काश्मिरातील लाल चौकात तिरंगा डौलात फडकला, याचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान आहे, असेही महाजन म्हणाले.
पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन-
यासोबतच, गिरीश महाजन यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आपल्या परीने शक्य ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे. या आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या सोबत असावे, असे भावनिक आवाहन महाजन यांनी केले.