जळगाव - पक्षाने आमच्यावर आधी विश्वास आणि नंतर अविश्वास का दाखविला? जर तिकिट कापायचेच होते तर आधी तिकिट द्यायलाच नको होते. पक्षाने केलेला हा राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकिट कापण्यात आलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केली आहे.
पक्षाने तिकिट कापल्यानंतर आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी वाघ दाम्पत्य पत्रकारांशी बोलत होते. पक्षाने तिकिट कापले तरी आमचा राष्ट्रीय व राज्य नेतृत्वावर विश्वास आहे. ते अजूनही आमचा विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, पक्षाने जो निर्णय दिला तो आम्हाला शिरसावंद्य राहील, असेही आमदार वाघ म्हणाल्या.
जळगाव लोकसभेसाठी भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना सुरुवातीला उमेदवारी दिल्याने भाजपात २ गट पडले होते. गटबाजीचा फटका बसू नये, म्हणून भाजपने जळगावात उमेदवार बदलण्याचा निर्णय घेऊन स्मिता वाघ यांच्याऐवजी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.