जळगाव - धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तसेच स्थानकावर रेल्वे येण्यापूर्वी वेग कमी होताच हातावर हल्ला करून मोबाईल लांबविणाऱ्या शेगावच्या चोरास भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आऊटरवर रेल्वे स्लो झाल्यानंतर प्रवाशांच्या हातावर दणकट वस्तूने हल्ला करून मोबाईल लांबविणाऱ्या या आरोपीचे नाव राहुल तायडे (२३, शेगाव) असे आहे.
तक्रारदार निलेश जगन्नाथ वाणी (जळगाव) हे २० मार्चरोजी पठाणकोट एक्स्प्रेसने खंडवा ते जळगाव प्रवास करीत होते. दरम्यान, भुसावळ आल्यानंतर आऊटरवर गाडीचा वेग कमी होताच सदर आरोपीने वाणी यांच्या हातावर लोखंडी रॉडने हल्ला करून ५८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर, नितीन पाटील, जयकुमार कोळी, सिद्धेश्वर देशमाने आदींनी गोपनीय माहितीवरून अप कामायनी एक्स्प्रेसमधून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास एएसआय भरत शिरसाठ करीत आहेत.