जळगाव - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याकडे पाहिले जात होते. कोरोना संसर्गाचा वेग आणि मृत्यूदर यामुळे जिल्हा राज्यच नव्हे तर देशाच्या नकाशावर झळकला होता. पण आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे आज जळगाव जिल्ह्यात काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सव्वा महिन्याच्या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे एकही बळी गेलेला नाही. कोरोनाचा उद्रेक अनुभवणाऱ्या जळगाववासीयांना हा खऱ्या अर्थाने दिलासा मानला जात आहे.
जिल्ह्यात ३१ मार्च २०२० रोजी पहिल्या बळीची नोंद
जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. हा रुग्ण जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रहिवासी होता. त्यानंतर ३ दिवसांनी म्हणजे ३१ मार्च २०२० रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पहिल्या लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेली होती. त्या तुलनेत कोरोनाचे बळी कमी प्रमाणात गेले होते. परंतु, संसर्गाचा विचार केला तर त्यावेळी जिल्ह्यातील मृत्यूदर हा १३ टक्क्यांच्या जवळपास होता आणि तो देशात सर्वाधिक होता. दुसऱ्या लाटेत ही परिस्थिती बदलली. यावेळी कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला, तसा कोरोनाचे बळीही वाढले होते. बळी जाणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्याही मोठी होती. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर पुन्हा वाढून आरोग्य यंत्रणा अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून आले होते.
जिल्ह्यात आतापर्यंत गेलेत २५७५ जणांचे बळी
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दुसरी लाट आली तेव्हा कोरोना बळींची संख्या अत्यंत गतीने वाढली. कोरोनाने हजारोंच्या संख्येने जिल्ह्यात बळी घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७५ जणांचे बळी गेले आहेत. त्यात १ हजार ३६६ जण हे ५० किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील होते. तर १ हजार ३०० जण हे को-मोर्बिड म्हणजेच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, दमा अशा दुर्धर आजारांनी आधीच ग्रस्त होते.
जिल्ह्यात १५ जुलैपासून नाही कोरोनाचा बळी
जळगाव जिल्ह्यात सर्वात शेवटचा कोरोना बळी १५ जुलै २०२१ रोजी गेला होता. या दिवशी भडगाव तालुक्यातील एका ३६ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. १ जुलै ते २७ ऑगस्ट या साधारणपणे २ महिन्यांच्या कालावधीचा विचार केला तर जिल्ह्यात केवळ ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ३ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. ४० वर्षाआतील दोन प्रौढ तसेच ६०, ६५ व ७३ वर्षीय महिलांचा यात समावेश आहे. हे मृत्यू १५ जुलै पूर्वीचे आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
जिल्ह्यातील कोरोना बळी थांबण्यामागे काय कारणे आहेत, याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आणि जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यानंतर जिल्ह्यात तब्बल सव्वा महिन्यापासून एकाही कोरोना रुग्णाला जीव गमवावा लागलेला नाही. एवढ्या मोठ्या कालावधीपासून कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू न होणे हे जिल्ह्यात 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाल्याचे म्हणता येईल. जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण वेगाने सुरू आहे. लसीकरणामुळे निश्चितच पॉझिटिव्ह रिझल्ट समोर येत आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाला तरी तो फार नुकसान करत नाही. लसीकरण झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात दाखल राहण्याचा कालावधी नक्की कमी होतो. हर्ड इम्युनिटीमुळे मृत्यूचे प्रमाण घटले असावे. मात्र, असे असले तरी आपल्याला गाफील राहता येणार नाही. आजही प्रत्येकाने मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि फिजिकल डिस्टन्सिंग या कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.
कोरोनाची तालुकानिहाय मृत्यूची आकडेवारी
जळगाव- ५७२
जळगाव ग्रामीण- १४५
भुसावळ- ३३५
अमळनेर- १४०
चोपडा- १६०
पाचोरा- १३५
भडगाव- ७८
धरणगाव- १०७
यावल- १३५
एरंडोल- १११
जामनेर- १६६
रावेर- १८३
पारोळा- ५०
चाळीसगाव- १२६
मुक्ताईनगर- ८५
बोदवड- ४७
हेही वाचा - अमरावतीत ऑनर किलिंग, प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय कबड्डीपटू तरुणाची सहा जणांनी केली हत्या