जळगाव - शहरातील दूध फेडरेशन परिसरात असलेल्या एका सौंदर्य प्रसाधनांच्या साहित्याचे गोदाम फोडून चोरट्यांनी १९ लाख १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी रात्री चोरट्यांनी ही हातसफाई केली आहे. या चोरीच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
राजीव हरीओम अग्रवाल (वय ५४, रा. शिवाजीनगर, राधाहवेली) यांच्या मालकीच्या सावरिया कंझ्युमर प्रा. लि. नावाच्या गोदामात ही चोरी झाली आहे. सौंदर्य प्रसाधने, खोबरेल तेल, साबण, धान्य, मेहंदी पावडर आदी घाऊक साहित्याचे हे गोदाम आहे. बुधवारी नियमितपणे रात्री ८ वाजता अग्रवाल यांनी गोदामाचे १२ शटर कुलूपबंद केले होते. यानंतर ३५ कर्मचारी व अमिन युनूस पटेल, कमलाकर सोनवणे हे दोन्ही व्यवस्थापक घरी निघून गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी गोदामाच्या एका शटरचे कुलूप तोडले.
हेही वाचा - जळगाव महापालिकेत शिवसेना नगरसेवकाचा हंगामा; पळवला राजदंड
शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर गोदामातील तिजोरीत ठेवलेली १९ लाख १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. गुरुवारी सकाळी ९ वाजता कमलाकर सोनवणे हे काही कर्मचाऱ्यांसह गोदाम उघडण्यासाठी आले. यावेळी त्यांना शटरचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी मालक अग्रवाल यांना फोनवरून माहिती दिली. तपासणी केली असता गोदाममधील तिजोरीतून रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आहे.
हेही वाचा - छगन भुजबळ नाशिक मेट्रो प्रकल्प रद्द करण्याच्या तयारीत; आमदार देवयानी फरांदेंचा आरोप
त्यानंतर राजीव अग्रवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव सोनवणे तपास करीत आहेत.