जळगाव - शहरातील अयोध्या नगर परिसरात असलेल्या एका बंगल्यात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
अयोध्या नगरातील गणपती मंदिराजवळ राहणारे अशोक फुलचंद जैस्वाल यांच्या राहत्या घरी ही चोरीची घटना घडली आहे. अशोक जैस्वाल यांच्या काकांचे निधन झाल्याने जैस्वाल कुटुंबीय रविवारी रात्री अंत्यसंस्कारासाठी मध्यप्रदेशातील खंडवा येथे गेलेले होते. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सोमवारी सकाळी हा प्रकार जैस्वाल यांच्या शेजारच्या लोकांच्या लक्षात आला. शेजाऱ्यांनी जैस्वाल यांना घटनेबाबत कळवल्याने जैस्वाल यांचे चिरंजीव दिनेश लागलीच जळगावात परतले.
श्वानपथकाला केले पाचारण-
या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र, श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंतच मार्ग दाखवला. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नाहीत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.