जळगाव - शहरात सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याजवळचे मेडीकल दुकान फोडले. या दुकानातून १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.
जळगावात पोलीस ठाण्यासमोरच चोरी; मेडिकल दुकान फोडून सव्वा लाखांची रोकड लंपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या समोरील भास्कर मार्केटमध्ये नाहटा रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या बाहेर 'वर्धमान ड्रग हाऊस' हे दिनेश व्यास यांच्या मालकीचे मेडीकल दुकान आहे. सोमवारी रात्री १०.३० वाजता व्यास नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले. यानंतर मंगळवारी सकाळी नाष्टा करून रुग्णालयामध्ये एका रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे औषधे लागणार होती. त्यामुळे दुकानमालक सकाळी ८ वाजता मेडिकल दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानाचे कुलूप आधीच उघडलेले होते. त्यांनी आत जाऊन तपासणी केली असता काऊंटरवर पायाचे ठसे दिसून आले. तसेच गल्ल्यामधील १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड देखील गहाळ असल्याचे निदर्शनास आले. दुकानात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर व्यास यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे तपासात अडचण -
नाहटा रुग्णालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु, व्यास यांच्या मेडिकल दुकानाच्या बाजुने कॅमेरा नसल्यामुळे त्यात चोरी होतानाचे चित्रीकरण झाले नाही. दरम्यान, हे मेडिकल दुकान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर आहे. या मार्गावर अनेक रुग्णालय असल्यामुळे रात्रभर नागरिकांची वर्दळ असते. अशा मुख्य रस्त्यावरील दुकानात चोरी झाल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.