जळगाव - शहरपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या आव्हाणे गावात गुरुवारी मध्यरात्रीनंतर तब्बल 12 घरांमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी गावातील कॉलनी परिसरातील बंद असलेली घरे लक्ष्य करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उजेडात आल्याने खळबळ उडाली. गावात एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या संख्येने घरांमध्ये चोरी झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करण्यापूर्वी रेकी केल्याचा संशय -
आव्हाणे गावातील पंढरीतात्या नगर, प्रताप जिभाऊ नगर, सरुआई नगर, खुबचंद साहित्या नगर व श्रीधर नगर या भागात तब्बल 12 घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी गावातील नवीन प्लॉट एरिया मधीलच घरे टार्गेट केली. ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे, त्या घरातील सदस्य बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी गावात फिरून रेकी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'उरी'ची अभिनेत्री 'ईडी'च्या रडारवर, यामी गौतमची ७ जुलैला होणार चौकशी
काही ठिकाणी फसला चोरीचा प्रयत्न -
चोरट्यांनी 12 घरांसह इतर घरांमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या घरात रहिवासी असल्याने प्रयत्न फसला. चोरांनी काही घरांच्या दरवाज्याचा कड्यादेखील तोडल्या आहेत. आव्हाणे गावातील मुख्य चौकासह व गावाबाहेरील अनेक दुकानेही रात्री उशिरापर्यंत उघडी असतात. तसेच मुख्य रस्त्यासह नवीन प्लॉट एरियातदेखील रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. त्यामुळे चोरांनी मध्यरात्रीनंतर चोऱ्या केल्या असाव्यात, असा संशय आहे.
असा ऐवज झाला आहे लंपास -
गावातील रमेश पाटील यांच्या घरातून 60 ग्रॅम चांदीचे व 22 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. निंबादास पाटील यांच्या घरातून 23 हजार रुपयांची रोकड, दिलीप रामचंद्र चौधरी यांच्या घरातून 2 हजारांची रोकड, राहुल चौधरी यांच्या घरातून 3 हजारांची रोकड, इंद्रकुमार बिहारी यांच्या घरातून 3 हजार रुपयांच्या रोकडसह 9 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. भावलाल सपकाळे यांच्या घरातून 2 हजारांची रोकड चोरीला गेली आहे. इतर घरांमधून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
भंगार विक्रेत्यांनी चोरी केल्याचा अंदाज -
गावात काही भंगार विक्रेते दाखल झाले होते. या भंगार विक्रेत्यांनी गावातील नवीन प्लॉट एरियामध्ये फेरफटका मारल्याची माहिती आव्हाणे येथील ग्रामस्थांनी दिली. याच भंगार विक्रेत्यांनी रेकी करून चोरी केल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - जोपर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता, तोपर्यंत आमच्या जीवनात ईडी राहणार - थोरात