जळगाव - राज्यभरात युवा सेनेचे कार्य जोमाने विस्तारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या लोकप्रियतेमुळे तरुणाई युवा सेनेकडे आकर्षित होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य निवडणुकीत 10 पैकी 10 जागा युवा सेनेने काबीज केल्या आहेत. मुंबई विद्यापीठात हा करिष्मा होऊ शकतो, तर राज्यभरातील इतर विद्यापीठांमध्ये का नाही? संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आगामी काळात महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या सिनेट सदस्य निवडणुकांमध्ये युवा सेनेची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी वर्तवला.
हेही वाचा - ..अन्यथा सविनय कायदेभंग, जळगावातील व्यापाऱ्यांचा सरकारला इशारा, कोरोना निर्बंधाविरोधात व्यापारी आक्रमक
युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने वरुण सरदेसाई हे गुरुवारी जळगाव जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदींची उपस्थिती होती.
चांगले काम करणाऱ्यांना पुढे आणायचे आहे
कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे, त्यांच्या अडीअडचणी, सूचना जाणून घेता आल्या नाहीत. आता कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात ओसरला आहे. त्यामुळे, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधता यावा म्हणून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून मी राज्यभर दौरा करत आहे. याआधी पुणे जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात जाऊन आलो. आता उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. युवा सेनेत चांगले काम करणाऱ्यांना आम्हाला पुढे आणायचे आहे. यात नवीन कार्यकर्त्यांना तालुका, जिल्हा पातळीवर उभे करून युवा सेनेची चांगली फळी उभारायची आहे, असे सरदेसाई म्हणाले.
युवासेनेत खांदेपालट नाहीच
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मंत्रिपदामुळे युवासेनेच्या कार्यविस्ताराकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता वरुण सरदेसाई म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच आतापर्यंत युवा सेनेचे कार्य विस्तारले आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत युवा सेनेत खांदेपालट होणार नाही. युवा सेनेची संघटनात्मक बांधणीचे काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सरदेसाई म्हणाले.
हेही वाचा - जळगावात 22 वर्षीय महिलेने दिला तिळ्यांना जन्म; मातेसह मुलांची प्रकृती ठणठणीत