जळगाव - यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शाळा बंद असून, शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शालेय वह्या, पुस्तके तसेच इतर स्टेशनरी साहित्य खरेदी-विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे या क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे वह्या, पुस्तके निर्मिती करणाऱ्या कारखानदारांसह विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या-रजिस्टर तयार करण्याची लगबग सुरू होते. वह्या-रजिस्टरसाठी कारखानदार आधीच लाखो रुपयांचा कच्चा माल मागवून ठेवतात. या कारखानदारांनी कर्ज काढून लाखो रुपये गुंतवून ठेवले आहे. मात्र, कोरोना व टाळेबंदीमुळे वह्या व रजिस्टर मालाला 10 टक्केदेखील उठाव मिळाला नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी हाेण्याची वेळ आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होते. मुलांच्या परीक्षांचा निकाल एप्रिल-मेमध्ये घोषित झाल्यानंतर पालकांची आपल्या पाल्यांसाठीची शैक्षणिक तयारीसाठी लगबग सुरू होते. त्यामुळे या काळात व्यापारी, स्टेशनरी दुकानदारांकडून वह्या व रजिस्टरची नोंदणी व माल मागवण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना फैलाव मार्चपासूनच सुरू झाल्याने कोणत्याही व्यापारी व दुकानदारांनी नवीन स्टेशनरी बुकिंग किंवा माल मागवला नसल्याने सर्व माल अद्यापही पडून आहे. टाळेबंदीमुळे 10 टक्के देखील व्यवसाय न झाल्याने या कारखान्यांत तयार झालेला संपूर्ण माल गोडाऊनमध्ये पडून आहे. दरवर्षी वह्या-रजिस्टर विक्रीतून दोन कोटींच्यावर उलाढाल होत असते. मात्र, यंदाच्या सिजनमध्येच कोरोनाचा फैलाव झाल्याने मोठी उलाढाल ठप्प आहे.
आतापर्यंत केवळ 5 टक्के विक्री
कोणत्याही प्रकारच्या वह्या, रजिस्टर नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यापासून मागवण्यात आलेले नाही. गेल्या वर्षीचाच माल विक्रीवर भर आहे. यंदा ऑनलाइनचे शैक्षणिक वर्ष अर्धे संपत आले आहे. दरवर्षी दिवाळीनंतर विद्यार्थी दुसऱ्या सत्रासाठी परत वह्या व रजिस्टर खरेदी करतात. मात्र, यंदा अजून दुकानातील पाच टक्के देखील वह्या व रजिस्टरची विक्री झालेली नाही. इतर शैक्षणिक साहित्याचीही तीच गत असल्याने चिंता वाढली. चित्र बदलायला हवे, अशी अपेक्षा वह्या विक्रेत्यांनी व्यक्त केली.
विक्री पूर्णपणे बंद; माल सांभाळण्याची वेळ
यंदा 10 टक्क्यांवर वह्या व रजिस्टरची विक्री झालेली नाही. या उलट लाखो रुपयांचा तयार माल गोडाऊनमध्ये पडून असल्याने त्यांच्या देखरेखीसाठी खर्च करावा लागत आहे. वह्या-रजिस्टरला वाळवी, पाऊस व धुळीपासून सुरक्षित ठेवावा लागत आहे. वह्या व रजिस्टरची नियमित साफसफाई करून येथे डामर गोळ्या ठेवाव्या लागतात. तसेच घुसा व उंदरांपासून वह्यांच्या सुरक्षेसह येथे दिवसा व रात्री वॉचमन ठेवावा लागतो. नेहमीचे कामगार असल्याने त्यांना सोडताही येत नसल्याने त्यांना नियमित पगारही द्यावा लागत आहे, अशी माहिती वह्यांचे कारखानदारांनी दिली.
हेही वाचा - दारू पिताना किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत