जळगाव - एका खासगी फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. सोमवारी (दि. 21 जून) सकाळी ही घटना उजेडात आली. प्रदीप धनलाल शिंपी (वय 45 वर्षे, रा. मयुर कॉलनी, जळगाव), असे आत्महत्या करणाऱ्या मॅनेजरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी प्रदीप यांनी तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. कामाचा ताण वाढल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नोटमध्ये म्हटले आहे.
![सुसाईड नोट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-bank-manager-suicide-7205050_21062021200416_2106f_1624286056_591.jpg)
साडेतीन वर्षांपासून होते कंपनीत कार्यरत
प्रदीप शिंपी हे मुथ्थूट होमफिन इंडिया लिमिटेड या फायनान्स कंपनीत 1 नोव्हेंबर, 2017 पासून क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे जळगावसह औरंगाबाद, धुळे व शिरपूर विभागाची जबाबदारी होती. गेल्या काही दिवसांपासून कामाचा ताण वाढल्याने ते तणावात होते. त्यांनी रविवारी (दि. 20 जून) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि. 21) सकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
![सुसाईड नोट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-bank-manager-suicide-7205050_21062021200416_2106f_1624286056_1070.jpg)
सुसाईट नोटमध्ये भावनिक उल्लेख
प्रदीप शिंपी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वःहस्ताक्षरात तीन पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी कामाचा ताण वाढल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. यासोबतच त्यांनी कंपनी प्रशासनाला कुटुंबीयांना शक्य ती मदत करण्याची भावनिक विनंतीही केली आहे.
![सुसाईड नोट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-bank-manager-suicide-7205050_21062021200416_2106f_1624286056_1025.jpg)
कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामाचा अतिरिक्त ताण दिल्याने प्रदीप शिंपी यांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप करत शिंपी यांच्या कुटुंबीयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल केला नाही तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पण, पोलिसांनी समजूत काढली. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'मसाका'तील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रश्नी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन