जळगाव - ग्रामीण भागातील अकुशल मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांना आपल्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' राबवली जाते. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या काळात रोजगार हमी योजना जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार मजुरांसाठी वरदान ठरली. या योजनेच्या माध्यमातून गावातच काम मिळाल्याने मजुरांची उपजीविका सुरू राहिली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकूण 873 कामे सुरू असून, त्यावर साडेसात हजार मजूर कार्यरत आहेत.
बेरोजगार मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची कामे
रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारच्या सहकार्याने ग्रामीण भागात होते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम भाग मानल्या जाणारी ग्रामपंचायत योजनेची कार्यान्वयीन यंत्रणा असते. ग्रामपंचायतीमार्फत आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या बेरोजगार मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरुपाची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. बेरोजगार मजुरांना वर्षभराच्या कालावधीत किमान 100 दिवस काम उपलब्ध करून त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
कोरोनाकाळातही योजना राहिली सुरू
आपल्याकडे मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. पुढे जाऊन संसर्ग वाढल्याने टाळेबंदीचे पाऊल उचलावे लागले. सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले. परंतु, जळगाव जिल्ह्यात सुरुवातीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता रोजगार हमी योजनेची कामे नेहमीप्रमाणे सुरू राहिली. विशेष म्हणजे, उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये गेलेल्या ग्रामीण भागातील लोकांना टाळेबंदीमुळे गावाकडे परतावे लागले. अशा लोकांनाही रोजगार हमी योजनेने तारले. ग्रामीण भागातील अर्थकारण सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या खबरदारीचे नियम पाळून रोजगार हमी योजनेच्या कामे सुरू राहतील, या दृष्टीने उपाययोजना केल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मजूरांना आवश्यक त्या सूचना देऊन कामे उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना हँड सॅनिटायझर, साबण, मास्क अशा प्रकारची साधनेही उपलब्ध करून देण्यात आली.
'या' प्रकारच्या कामांचा योजनेत आहे समावेश
रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत माहिती देताना 'रोहयो'चे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात आजरोजी रोजगार हमी योजनेची एकूण 873 कामे सुरू असून, त्यावर 7 हजार 400 मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षभराचा विचार केला तर डिसेंबर अखेरपर्यंत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 13 लाख 29 हजार 694 मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरुपाची कामे उपलब्ध करून दिली जातात. त्यात प्रत्येक मजुराला एका दिवसाला जास्तीत जास्त 238 रुपये मजुरी मिळते. सार्वजनिक स्वरुपाच्या कामांमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची कामे, सार्वजनिक विहिरी, रोपवाटिका, वृक्षलागवड, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षक भिंती या कामांसह जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचा समावेश असतो. तर वैयक्तिक स्वरुपाच्या कामांमध्ये विहीर, फळबाग लागवड, घरकूल किंवा जनावरांचा गोठा यांचे बांधकाम, शोषखड्डे निर्मिती यासारख्या कामांचा समावेश होतो. जळगाव जिल्ह्यात विशेष बाब म्हणून रोजगार हमी योजनेच्या कामात रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली तुती लागवडीच्या कामाचा देखील समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून निधीची तरतूद केली आहे, असेही प्रसाद मते यांनी सांगितले.
ऑनलाइन पद्धतीने चालते योजनेचे काम
रोजगार हमी योजनेचे काम हे केंद्र सरकारच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने चालते. त्यात प्रत्येक जिल्ह्यात आजरोजी किती कामे सुरू आहेत, त्यावर किती मजूर काम करत आहेत, योजनेतील कोणत्या कामांवर किती खर्च झाला आहे, कामांचे स्टेटस काय आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, असेही उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.
यावल तालुक्यात सुरू आहेत सर्वाधिक कामे
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 183 ग्रामपंचायतींपैकी 353 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची 873 कामे सुरू आहेत. त्यात सर्वाधिक 155 कामे ही यावल तालुक्यात सुरू आहेत. त्या खालोखाल पारोळा तालुक्यात 112 काम सुरू आहेत. सर्वाधिक कमी म्हणजेच 7 कामे ही बोदवड तालुक्यात सुरू आहेत. त्याचप्रमाणे मजुरसंख्येचा विचार केला तर जिल्ह्यात सर्वाधिक मजूर हे पारोळा तालुक्यातील आहेत. पारोळा तालुक्यात 40 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची 112 कामे सुरू असून, त्या कामांवर 2 हजार 289 मजूर काम करत आहेत. त्याचप्रमाणे यावल तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची 155 कामे सुरू असून, त्या कामांवर 775 मजूर कार्यरत आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीवर एक नजर
- अमळनेर - 47 ग्रामपंचायती, 526 मजूर, 85 कामे
- भडगाव - 7 ग्रामपंचायती, 127 मजूर, 11 कामे
- भुसावळ - 12 ग्रामपंचायती, 147 मजूर, 17 कामे
- बोदवड - 4 ग्रामपंचायती, 74 मजूर, 7 कामे
- चाळीसगाव - 24 ग्रामपंचायती, 423 मजूर, 70 कामे
- चोपडा - 36 ग्रामपंचायती, 401 मजूर, 72 कामे
- धरणगाव - 12 ग्रामपंचायती, 128 मजूर, 23 कामे
- एरंडोल - 23 ग्रामपंचायती, 576 मजूर, 76 कामे
- जळगाव - 21 ग्रामपंचायती, 325 मजूर, 35 कामे
- जामनेर - 36 ग्रामपंचायती, 690 मजूर, 71 कामे
- मुक्ताईनगर - 20 ग्रामपंचायती, 350 मजूर, 73 कामे
- पाचोरा - 29 ग्रामपंचायती, 468 मजूर, 45 कामे
- पारोळा - 40 ग्रामपंचायती, 2289 मजूर, 112 कामे
- रावेर - 11 ग्रामपंचायती, 101 मजूर, 21 कामे
- यावल - 31 ग्रामपंचायती, 775 मजूर, 155 कामे
- एकूण - 353 ग्रामपंचायती, 7400 मजूर, 873 कामे