जळगाव - शहरातील तुळजाई नगर येथील साई गणेश मंदिरात विजेच्या जोरदार धक्क्याने अनुपम मोहन प्रसाद (वय २५) या तरुण पूजार्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (१३ डिसेंबर) घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळ मध्यप्रदेशातील सटना येथील रहिवासी अनुपम प्रसाद हे सात वर्षापासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पूजारी म्हणून काम पाहत होते. योगेश्वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास होते. आईवडील गावाकडे असल्याने तसेच अनुपम प्रसाद हे अविवाहित असल्याने एकटेच राहत होते. रविवारी सकाळी अनुपम प्रसाद पूजा करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. याठिकाणी स्वच्छता केल्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटन दाबण्यासाठी गेले असता, त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे आज सकाळी आरतीसाठी मंदिरात गेले -
रोज सकाळी 1 वाजता ते मंदिरात आरती करत. आजही आरतीसाठी मंदिराजवळ राहत असलेल्या विमल अशोक कुदळ या मंदिरात आल्या, तेव्हा त्यांना पूजारी प्रसाद हे पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळीने तसेच झाडूच्या सहाय्याने प्रयत्न करुन वीजप्रवाह खंडीत केला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देवून यादव यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांना त्यांना मृत घोषित केले.
शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद -
प्रकाराची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दिपक जाधव यांच्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काल मंदिराचा वर्धापनदिवस केला साजरा -
तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात 2012 साली साईगणेश मंदिराचे बांधकाम झाले. तेव्हापासून या मंदिरावर अनुपम प्रसाद हेच पूजारी म्हणून काम पाहत होते. काल ( १२ डिसेंबर) मंदिराचा वर्धापनदिन होता. पूजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होवून महाप्रसादाचे वाटप झाले होते. त्यानंतर आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान प्रकाराबाबत महापालिकेला कळवण्यात आले असून डीपीवरील पूरवठा खंडीत करण्याबाबत सांगण्यात आले.
हेही वाचा - हरयाणा आरोग्य मंत्री अनिल विज यांचा दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह