जळगाव - कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिल्यास १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते, या भीतीने नागरिक स्वॅब देण्यास घाबरतात. मात्र, स्वॅब दिल्यानंतर दोन दिवसातच अहवाल येईल, याची मी हमी घेतो. त्यामुळे स्वॅब देण्यास घाबरु नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'संशयित रुग्ण शोध पंधरवाडा'विषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी सायंकाळी 7 वाजता ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.
स्वॅबचे अहवाल येण्यास उशीर होत असल्याने बरेच रुग्ण घाबरून स्वयंस्फूर्तीने स्वॅब देण्यास पुढे येत नाही. आता मात्र तशी परिस्थिती नसून स्वॅबचे रिपोर्ट लवकर येणार असल्याने नागरिकांना जास्त वेळ विलगीकरणात रहावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णांमधील भीती आणि गैरसमज दूर होणार असून नागरिकांनीही स्वॅब देण्यास घाबरू नये, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी नमूद केले. स्वॅब घेण्यासाठी दोन मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक; जळगाव जिल्ह्यात आढळले 170 नवे पॉझिटिव्ह; बाधितांची एकूण संख्या 2757 वर
बांधितांची संख्या जास्त दिसली तरी घाबरू नका -
महापालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकायार्तून संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत बाधित रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याने रुग्णांची संख्याही वाढणार आहे. असे असले तरी भविष्यातील धोका कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संशयित रुग्ण शोध पंधरवाड्यात त्वरित निदान, त्वरित तपासणी, त्वरित उपचार (ट्रेस, टेस्ट व ट्रीट अशा ट्रीपल ‘टी’) या तत्त्वांचा अवलंब करत कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.
मृत्यूदर होईल कमी -
रुग्णाचे लवकर निदान झाले नाही तर त्याच्या मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे या पंधरवाड्यामध्ये मृत्यूदर कमी करण्यावर भर राहणार असल्याने तत्काळ निदान होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात येणार आहे. यात निदान लवकर झाल्यास त्वरित तपासणी करण्यात येऊन त्यावर काय उपचार करणे आवश्यक आहे हे समोर येईल आणि त्यानुसार त्वरित उपचार मिळतील. त्यामुळे त्वरीत निदान, त्वरीत तपासणी, त्वरित उपचार (ट्रीपल टी) यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
लॅबची क्षमता ५०० अहवालांपर्यंत नेणार -
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लॅबमधून १७० अहवाल दररोज येत आहेत. ही क्षमता शनिवारपर्यंत ५०० पर्यंत वाढविणार असून, यासाठी वाढीव उपकरणांचा वापर केला जाऊन जास्तीत जास्त अहवाल वेळेत येण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 204 वर -
जळगाव जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 204 वर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक 156 रुग्णांचे बळी हे कोविड रुग्णालयात गेले आहेत. तर गणपती हॉस्पिटलमध्ये 4, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये 14, गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये एक, पाचोरा तीन, चोपडा दोन, चाळीसगाव एक, अमळनेर एक, इतर जिल्ह्यातील 7 आणि 15 रुग्ण हे मृतावस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. आतापर्यंत असे एकूण 204 बळी कोरोनामुळे गेले आहेत.
दरम्यान, बुधवारी 4 रुग्णांचे कोरोनामुळे बळी गेले. त्यात धरणगाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषासह रावेर येथील 56 वर्षीय पुरुष तसेच भुसावळ तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष आणि 73 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. याशिवाय जळगावातील 50 वर्षीय दोन पुरुषांचाही मृत्यू 21 आणि 23 तारखेला झाले होते. या दोघांचे कोरोनाचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. गेल्या आठवडाभरात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांमुळे जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर हा साडेसात टक्क्यांवर आला आहे.