जळगाव - शहरातील एका २४ वर्षीय तरुणाने आपले वडील आणि मामांच्या डोळ्यादेखत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इम्रान खान अकिल खान (वय २४, रा. अक्सानगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. इम्रान याला मायग्रेन आजाराचा त्रास होता. आजाराला कंटाळल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली आहे.
दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
इम्रान हा एमआयडीसीतील एका कपाट बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. त्याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते. त्याला मायग्रेनचा त्रास होता. यामुळे तो प्रचंड तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई सुगराबी, वडील अकील खान व पत्नी हिनाबी असा परिवार आहे.
कुटुंबीयांसोबत वाद अन् पुढे घडले भलतेच
इम्रान याचा कुटुंबीयांसोबत काहीतरी कारणावरून वाद झाला. आधीच मायग्रेनचा त्रास त्यात कुटुंबीयांशी वाद झाल्याने तो घराबाहेर पडला. शहरातील शिवाजी उद्यानातील विहिरीजवळ तो येऊन थांबला. त्याच्या मागे वडील अकिल खान व मामा आसिफ शेख अब्दुल गफ्फार हे देखील आले. पण ते जवळ पोहचण्याच्या आधीच त्याने विहिरीत उडी घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा-पुणे : नऊ लाखाच्या लाच प्रकरणी नगरपरिषद मुख्यधिकाऱ्याला अटक