जळगाव - 'तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय' असे म्हणत हवामान बदलाच्या प्रश्नावर स्विडनची विद्यार्थिनी ग्रेटा थनबर्ग हिने अवघ्या जगाचे लक्ष वेधले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या ग्रेटा थनबर्गच्या समर्थनासाठी शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे येथील शेकडो शाळकरी विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दोन किलोमीटरपर्यंत मानवी साखळी तयार करत गिरणा नदी वाचविण्याचा संकल्प केला.
पर्यावरण विषयावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रेटाने सोशल मीडियावर 'फ्रायडे फॉर फ्युचर' ही मोहीम उभारली आहे. या मोहिमेला जगभरातील विविध देशांमधून मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई व पुणे वगळता कोणत्याही मोठ्या शहरात हे आंदोलन झालेले नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या ग्रेटाच्या मोहिमेने प्रभावित होऊन आव्हाणे गावातील युवकांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. आव्हाणे गावाच्या रूपाने ग्रामीण भागातून ग्रेटाला पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले. आव्हाणे हायस्कूलपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. शानूबाई पुंडलिक चौधरी हायस्कूल, आचार्य गुरुकुल, जि. प. शाळा, आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थ्यांसह वंदे मातरम युवा संघटना, मोरया ग्रुप, लालवटा ग्रुप, आव्हाणे फर्स्टचे युवक देखील मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले. गिरणा नदीतून होत असलेला अवैध वाळू उपसा व त्यामुळे नदीची होत असलेली दुर्दशा याकडे विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह नागरिकांचे लक्ष वेधले. ग्रेटाने सुरु केलेल्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ अंतर्गत सोशल मीडियावर देखील आव्हाण्याच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली.
हेही वाचा - जोधपूरमध्ये बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; १६ ठार, १० गंभीर
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वुई ऑल ग्रेटा’च्या जोरदार घोषणा देत ग्रेटाच्या आंदोलनाला पाठींबा दिला. ‘पर्यावरण बचाव, गिरणा बचाव’, ‘सामील व्हा, सामील व्हा, गिरणेसाठी सामील व्हा', अशा घोषणांनी संपूर्ण आव्हाणे परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, सोशल मीडियामुळे स्वीडनसारख्या परदेशात सुरू झालेली सामाजिक चळवळ आव्हाण्यासारख्या ग्रामीण भागातील खेड्यापर्यंत पोहचू शकली. या उपक्रमाच्या निमित्ताने सोशल मीडियाचा प्रभाव दिसून आला.
हेही वाचा - नेमका का दिला अजित पवारांनी राजीनामा?