जळगाव - शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, लचके तोडणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, शहरातील वाघनगर परिसरात एका कुत्र्याने 10 बालकांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील वाघनगर परिसरातील ओम साईराम नगरात ही घटना घडली आहे. एका कुत्र्याने तब्बल 10 बालकांचे लचके तोडले. या घटनेत जखमी झालेली सर्वच बालके ही 3 ते 11 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 3 बालकांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या बालकांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाघनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात असताना महापालिका प्रशासन मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
3 बालकांना गंभीर दुखापत -
या घटनेत 3 बालकांना गंभीर दुखापत झाली आहे. शिव किनगे, वैभवी दंडगव्हाळ, आयुष सत्रे अशी जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 7 बालकांना प्रतिबंधात्मक लस देऊन घरी सोडण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या तीनही बालकांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा मुद्दा ऐरणीवर -
वाघनगरात घडलेल्या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम सध्या बंद आहे. दरम्यान, कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी या घटनेसंदर्भात बोलताना दिली.
हेही वाचा - बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!