जळगाव - जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, धरणगाव तालुक्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, वादळामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरे व गोठ्यांवरील पत्रे उडाले.
मंगळवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी 3 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. भडगाव, पाचोरा या तालुक्यांत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. धरणगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्येदेखील वादळी पाऊस झाला. जळगाव शहरात सायंकाळी 5 वाजेनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही वेळ जोराचा वारा वाहत होता. मात्र, पाऊस बरसला नाही. भडगाव तालुक्यात तासभर वादळी पाऊस झाला. वादळामुळे या तालुक्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजांचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
अवकाळी पावसामुळे भडगाव तालुक्यातील गावांमध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. भडगाव तालुक्यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बातसर, लोण पिराचे या गावांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेला असताना आता हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांना दिले आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पाचोरा प्रांताधिकाऱ्यांनी विशेष पथके नेमले असून या पथकांमार्फत बुधवारी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.