जळगाव : दोन तीन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचे पडसाद उमटत दोन गटात दगडफेक झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडली. शुक्रवारच्या मध्यरात्री शहरातील दगडी गेट परिसरातील जिंजर गल्लीसह गांधलीपुरा भागात दगडफेकीची घटना घडली. दरम्यान पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
या दगडफेकीच्या घटनेत काही वाहनांचे नुकसान झाले आहे. दोन- तीन पोलीस कर्मचारीसह 3 ते 4 नागरिकही जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेनंतर काही वेळात पोलिसांची कुमक पोहोचतच परिस्थिती नियंत्रणात आली. या भागात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 32 तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्रीपासूनच अंमळनेर शहरातील मुख्य चौकात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येत्या 12 जूनपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
कोल्हापुरातील तणाव दोन दिवसांनंतर संपुष्टात - शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूर शहरातील काही तरुणांनी व्हाट्सअपला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. बुधवारी कोल्हापूर बंद ठेवून हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने कोल्हापूर शहरातील काही ठिकाणी दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये आणि सोशल मीडियावर अफवा पसरून तणाव निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. गुरुवारी कोल्हापूर शहरातील परिस्थिती पूर्वरत झाली होती. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांच्या व्यवहारांसह इतर अनेक कामे खोळंबल्याने सर्वसामान्य नागरिकांची वाताहात झाली. अखेर आज इंटरनेट सेवा सुरू झाल्याने कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.