जळगाव - जुन्या वादातून एका महिला वाहकाने एसटीचे जळगाव विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी जळगाव आगारातील कार्यालयात घडली. मारहाण करण्यापूर्वी महिला वाहकाने देवरे यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड असलेला स्प्रे मारला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
सुनीता लोहार असे देवरेंना मारहाण करणाऱ्या महिला वाहकाचे नाव असून त्या एस. टी. महामंडळाच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आगारात कार्यरत आहेत. लोहार यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एस. टी. विभागाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे या आधी धुळे विभागात कार्यरत होते. त्यावेळी सुनीता लोहार तेथेच वाहक म्हणून कार्यरत होत्या. अडीच वर्षांपूर्वी धुळे येथे असताना देवरे यांनी लोहार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावरुन लोहार यांचे निलंबन झाले होते. त्यानंतर पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर लोहार यांची अक्कलकुवा येथे बदली झाली होती. तेव्हापासूनच देवरे आणि लोहार यांच्यात वाद आहेत. त्याचाच राग या महिलेच्या मनात असल्याचे देवरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
सुनीता देवरे आज जळगावात बसस्थानकात आल्या होत्या. विभाग नियंत्रक देवरे हे नेहमीप्रमाणे बसस्थानकातील कार्यालयात जात असताना लोहार यांनी जिन्यातच देवरे यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड असलेला स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी देवरेंना थेट मारहाण करायला सुरुवात केली. घटनास्थळी स्थानक प्रमुख नीलिमा बागुल या देखील उपस्थित होत्या. त्यांनी लोहार यांना तेथून बाहेर काढले. यानंतर विभाग नियंत्रक देवरे यांना दवाखान्यात नेण्यात आले. राजेंद्र देवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिसात सुनीता लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी लोहार यांना ताब्यात घेतले.