जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 29 जुलै) ऑनलाईन जाहीर झाला. नाशिक विभागात येणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल यावर्षी 93.51 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याच्या निकालाचा टक्का तब्बल 16.59 ने वाढला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल 76.92 टक्के इतका लागला होता. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी जळगाव जिल्हा नाशिक विभागात तिसऱ्या स्थानी राहिला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी जळगाव जिल्ह्यात 134 परीक्षा केंद्र होती. जिल्ह्यातील 59 हजार 71 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली. त्यात 33 हजार 751 मुले तर 25 हजार 320 मुली होत्या. त्यापैकी 55 हजार 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 31 हजार 84 मुले तर 24 हजार 156 मुली आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी 92.10 तर मुलींच्या निकालाची टक्केवारी 95.40 इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी 3.30 ने अधिक असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे.
जळगाव जिल्ह्यातून यावर्षी 19 हजार 270 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे, 21 हजार 252 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 12 हजार 223 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 2 हजार 495 विद्यार्थी हे साधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी तब्बल 16.59 ने वाढली आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोल विषयाचे मिळालेले सरासरी गुण या प्रमुख कारणांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली असावी, असा अंदाज शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
नाशिक विभागातून 1 लाख 85 हजार 557 विद्यार्थी उत्तीर्ण
यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून 1 लाख 99 हजार 66 विद्यार्थ्यांनी (नियमित) नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 97 हजार 976 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातून 1 लाख 85 हजार 557 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी 93.73 इतकी आहे. त्याचप्रमाणे, पुनर्परीक्षार्थी म्हणून नाशिक विभागातून 17 हजार 346 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 17 हजार 248 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 13 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 79.99 इतकी आहे.
नाशिक विभागात मुलांपेक्षा मुलीच हुशार
यावर्षी देखील नाशिक विभागात मुलांपेक्षा मुलीच हुशार निघाल्या. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.47 इतकी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.30 इतकी आहे. परीक्षेसाठी नोंदणी झालेल्या 1 लाख 9 हजार 719 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 9 हजार 116 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात 1 लाख 719 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर नोंदणी झालेल्या 89 हजार 347 विद्यार्थिनींपैकी 88 हजार 860 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यातून 84 हजार 838 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.