जळगाव - जिल्ह्यात मंगळवारी आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघेही पती-पत्नी असून अमळनेरातील साळीवाडा भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या या दाम्पत्याचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या 2 तर सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही 2 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आलेले होते. त्यांचे स्वॅब सोमवारी घेण्यात आले होते. मात्र, पत्नीचा मृत्यू झाला होता. तिच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने दोघेही एकाच वेळी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री काय आहे? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्यात देखील याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुक्त झालेल्या जळगावात तीन दिवसात तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हादरली आहे. दरम्यान, याआधीही अमळनेर तालुक्यातील मुंगसे गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता अमळनेर शहरातील साळीवाडा परिसरातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अमळनेर कोरोना हॉटस्पॉट होत असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनचे पालन करा-
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. तर जिल्हावासीयांनी स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. 'मीच माझा रक्षक' ही भूमिका अंगी बाळगून घरातच राहण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.