जळगाव - एका भामट्याने चक्क पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या अकाऊंटला कोणीही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन करणारी पोस्ट डॉ. मुंढे यांनी आपल्या व्हाटस्अप स्टेटसवर ठेवली आहे.
बड्या व्यक्तींच्या नावे अशा प्रकारे बनावट अकाऊंट तयार करुन भामटे त्यावरुन भावनीक पोस्ट करुन पैसे उकळत असल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. संबंधित व्यक्ती सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार करुन बनावट अकाऊंट बंद करुन घेत असतात. मात्र, आता या भामट्यांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नावाचे बनावट अकाऊंट तयार करेपर्यंत मजल मारली आहे. या बनावट अकाऊंटमध्ये प्रोफाइल पिक्चर, बॅकग्राऊंड पिक्चर डॉ. मुंढेंच्या खऱ्या अकाऊंटप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. त्यावरुन नागरिक, मित्रांना हे अकाऊंट खरे असल्याचे भासवले जात आहे.
अनेकांना आल्यात फ्रेंड रिक्वेस्ट-
या बनावट खात्यावरुन अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आहेत. त्या पैकी काही जणांना संशय आल्यानंतर त्यांनी हा प्रकार डॉ. प्रवीण मुंढे यांच्या लक्षात आणून दिला. दरम्यान, या बनावट अकाऊंटवर नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. अशा फेक अकाऊंटवरुन भामटे पैशांची मागणी करीत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रतिसाद न देता काही गैरकृत्य होत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी सोशल मीडियातून केले आहे. हे बनावट अकाऊंट बंद करण्यासाठी डॉ. मुंढे यांनी संबंधित विभागास सूचना दिल्या आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक -
यापूर्वी काही शासकीय अधिकारी, पोलीस दलातील मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन भामट्यांनी पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. प्रवीण मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, डॉ. मुंढेंच्या फेक अकाऊंटबाबत सायबर सेल विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे.
तत्काळ रिमूव्ह केले फेक अकाऊंट -
यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना एसपी डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, काल रात्री मला काही मित्रांचे फोन आले. त्यांनी आपल्याला फेसबुक अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचे सांगितले. मात्र, मी तशी कोणालाही रिक्वेस्ट पाठवली नसल्याने हा फेक अकाऊंटचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्काळ सायबर सेलकडे तक्रार करून ते अकाऊंट रिमूव्ह केले. नागरिकांनी देखील अशा प्रकाराबाबत दक्ष राहिले पाहिजे, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.