जळगाव - आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. नागपूर महापालिकेत तुकाराम मुंढेविरुद्ध राजकीय पदाधिकारी असा सामना रंगला होता. असाच सामना आता जळगाव महापालिकेतही रंगला आहे. जळगाव महापालिकेतील उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. उपायुक्त वाहुळे हे शहरात ठिकठिकाणी व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला नाहक लक्ष्य करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे त्यांची तक्रार केली आहे. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे हे जळगावचे तुकाराम मुंढे ठरतात की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे अनेकजण उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्री व अन्य साहित्य विक्रीचे काम करत आहेत. परंतु, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे हे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करून अवास्तव दंड वसुली करतात. माल जप्त करून घेतात. यामुळे अनेक हॉकर्स व व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. उपायुक्त वाहुळे यांना हॉकर्सच्या समस्यांची जाणीव करून द्यावी, अशा स्वरुपाची तक्रार शुक्रवारी दुपारी शिवसेना ग्राहक कक्षाकडून महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.
शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, राहुल नेतलेकर, लोकेश पाटील, चेतन प्रभुदेसाई, विजय राठोड, मंगला बारी, विलास बारी, हितेश शहा, राजेंद्र पाटील, निलू इंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केली. लॉकडाऊनचा काळ असल्याने अनेकांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक तरुण रस्त्यांवर भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र, उपायुक्त वाहुळे त्यांच्या अडचणी समजून न घेता थेट कारवाई करत आहेत. तसेच माल जप्त करून घेत आहेत. जप्त केलेला माल सोडण्यासाठी दंडाची रक्कम भरल्यानंतरही हॉकर्सला माल परत मिळत नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा नादात उपायुक्तांकडून हॉकर्सची गळचेपी सुरू आहे, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. उपायुक्तांनी आपली भूमिका बदलली नाही तर शिवसेनेच्या वतीने 'सेना स्टाईल' उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी आयुक्तांना देण्यात आला. या विषयाचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. याप्रश्नी उपायुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
कोरोनाच्या काळात व्यापक जनहित लक्षात घेऊनच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. म्हणून महापालिकेने हॉकर्सला शहरात 9 ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी त्यांनी व्यवसाय करणे अपेक्षित आहे. मात्र, तरीही कुणी जर रस्त्यावर थांबून व्यवसाय करत असेल. त्यामुळे गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होत असेल तर अतिक्रमण विभाग यापेक्षा अधिक कडक कारवाई करेल, अशी भूमिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना 'ई- टीव्ही भारत'कडे मांडली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईलच, असा इशारा देत वाहुळेंनी राजकीय दबाव झुगारून लावला असून, आगामी काळात या विषयावरून अधिकारी विरुद्ध पदाधिकारी हा सामना अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.