जळगाव - मला काही घडायचे आहे, बनायचे आहे. त्यामुळे मी जन आशीर्वाद यात्रा काढलेली नाही, तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठीच ही यात्रा मी काढली आहे. नवा महाराष्ट्र घडवायला मी निघालो आहे. मला तुम्ही साथ द्याल का? अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी जळगावकरांना साद घातली.
जळगाव जिल्हा आधीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याशी ऋणानुबंध जुळलेले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला पाचोरा तालुक्यापासून प्रारंभ करण्यात आला.
जन आशीर्वाद यात्रा ही काही निवडणुकीसाठी किंवा एखाद्या पदासाठी काढलेली यात्रा नाही. नवा महाराष्ट्र घडवण्याची हीच योग्य वेळ असल्याने मी ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला ज्या मतदारांनी भरभरून मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच ज्यांनी मतदान केले नाही किंवा ज्यांना मतदान करता आले नाही त्यांची मने जिंकणे हाच जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात निघ, असे दिवंगत बाळासाहेब ठाकरे जीवंत असते तर त्यांनी मला सांगितले असते. त्यामुळे कोणताही मुहूर्त न बघता आज तुमच्या साक्षीने जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असल्याचे आदित्य म्हणाले.
आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात प्रश्न वेगवेगळे आहेत. कुठे पाऊस पडलेला नाही. अनेक ठिकाणी दुष्काळ आहे. कुठे गारपीट आहे, कुठे बेरोजगारी आहे. मात्र, या सर्व प्रश्नांवर शिवसेना काम करत आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात देणे, त्यांची अडचण सोडवणे हीच शिवसेनेची विचारधारा आहे. याच विचारधारेने शिवसैनिक काम करत आहेत. पण राज्यातील प्रत्येक घरात भगवा गेल्याशिवाय नवा महाराष्ट्र घडणे शक्य नाही. त्यामुळे मला तुमची साथ हवी असल्याचे आदित्य म्हणाले.
शिवसैनिक म्हणून एकत्र या!
आपल्याला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी मतभेद, जातपात विसरून केवळ एक शिवसैनिक म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. नवा महाराष्ट्र घडवण्याच्या प्रवासात तुम्ही एकत्र याल का? मला आशीर्वाद द्याल का? अशी साद देखील त्यांनी यावेळी जळगावकरांना घातली.
सभेला उन्हाचा फटका -
आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्याच सभेला उन्हाचा फटका बसला. या सभेची वेळी दुपारी 12 ची होती. मात्र, उन्हामुळे लोकांची गर्दी जमत नसल्याने सभा तब्बल 2 तास उशिराने सुरू झाली. सभेला 12 वाजेपासून आलेल्या लोकांचे उन्हामुळे प्रचंड हाल झाले. सभा सुरू होत नसल्याने अनेकांनी सभा स्थळावरून काढता पाय घेतला होता.
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील; राऊतांचा पुनरुच्चार
आदित्य ठाकरे यांच्यात उत्तम नेतृत्वगुण आहेत. ते ज्या पद्धतीने शेतकरी, बेरोजगार तसेच तरुणांचे प्रश्न मांडत आहेत. त्यावरून त्यांच्यातील नेतृत्वक्षमता सिद्ध होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून पाहत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतीलच, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केला. यावेळी शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, रामदास कदम, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील आदी उपस्थित होते.