मुंबई : माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगाव येथील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी झाली आहे. सभेच्या ठिकाणाचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत मागील दोन दिवसांपासून पाचोऱ्या ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान शब्दांचा वृत्तांत पत्रकार परिषदा घेऊन मांडत आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यामुळे आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांना सभेत घुसण्याचा इशारा, गुलाबराव पाटील यांनी दिल्यानंतर राऊत यांनी सभेत घुसून दाखवा, असे प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष : राजकीय वातावरण तापल्यानंतर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढविण्यात आला आहे. मात्र, दोघांमधील वाद शिगेला पोहोचला असतानाच ठाकरे यांच्याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता मुंबईतून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण करतील. दुपारी बारा वाजता जळगाव विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर वाहनाने पाचोराकडे रवाना होती. दुपारी एक वाजता पाचोरा शहरातील वरखेडी फाटा ते महाराणा प्रताप चौकापर्यंत मोठे शक्तीप्रदर्शन करत मोटर सायकल रॅली काढली जाणार आहे.
सभेपूर्वीची रणनीती ठरविली जाणार : दरम्यान महाराणा प्रताप चौकात जंगी स्वागत केले जाईल. दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत निर्मल सीड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे. सभेपूर्वीची रणनीती यावेळी ठरवली जाणार आहे. सांयकाळी साडेचार वाजता जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांशी सल्लामसलत करतील. तसेच भारतातील प्रथम अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेल्या लॅबचे उदघाटन आणि माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता सभेच्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी पोहोचणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.