जळगाव - सध्या राजकीय पक्षांमध्ये ठिकाणा राहिलेला नाही. प्रत्येक पक्षात लोक निष्ठा विकून विष्ठा खायला निघाले आहेत, असे परखड मत शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषद, अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद व केशवस्मृती सेवासंस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगावात खान्देश लोककलावंत विचार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित लोकांना संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या काळातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परखड शब्दात मत मांडत नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, आमचे सरकार होणार होते का? तर नाही. प्यार का वादा किसके साथ, और शादी किसके साथ. हे का होऊ शकले, तर लोकांचे मन बदलले आहे. लोकांचे मन बदलल्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी झाल्या, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूनेच-
या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारणा केली. तेव्हा गुलाबराव पाटील म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, म्हणूनच अनेक नोकर भरती थांबवल्या आहेत. आरक्षणाची पुढची लढाई ही न्यायालयीन लढाई आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच आरक्षणाचा मुद्दा सुटू शकत नाही, याची सर्वांना कल्पना आहे. हा मुद्दा लवकर सुटून सर्वांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.