जळगाव - राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील धरणगाव नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने आहेत. या पोटनिवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात कोण बाजी मारते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचे दावेदार असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
हेही वाचा- डिझेल प्रति लिटर १७ ते १८ पैशाने महाग; पेट्रोल दर स्थिर
20 स्वतंत्र आणि 2 स्वीकृत अशा एकूण 22 सदस्य संख्या असलेल्या धरणगाव नगरपरिषदेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. याठिकाणी शिवसेनेचे सर्वाधिक 14 आणि भाजपचे 6 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेचे सलीम पटेल हे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. साडेतीन वर्षे ते पदावर होते. मात्र, दीर्घ आजारामुळे त्यांचे नुकतेच निधन झाल्याने नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. आता उर्वरित 18 महिन्यांच्या कालावधीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा असताना धरणगाव शहराच्या राजकीय वर्तुळात वेगळ्याच घडामोडी घडल्या.
हेही वाचा- स्टेट बँकेचे एटीएम कार्ड अधिक सुरक्षित; 'हा' केला नवा बदल
शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर करताच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला उमेदवार देऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अखेरपर्यंत उमेदवारी मागे न झाल्याने आता तिन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेकडून नीलेश सुरेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नीलेश भागवत चौधरी तर भाजपकडून मधुकर बन्सी माळी (रोकडे) रिंगणात उतरले आहेत. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी परस्पर विरोधात आहेत. काँग्रेसकडून देखील सुरुवातीला दीपक जाधव रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांनी माघार घेत शिवसेनेचे उमेदवार नीलेश सुरेश चौधरी यांना पाठिंबा दिला आहे.
दोन्ही गुलाबरावांची प्रतिष्ठा पणाला-
धरणगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात हाडवैर आहे. नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना केवळ दोघा नेत्यांमध्ये सख्य असल्यानेच दोन्ही मित्रपक्ष विरोधात उभे ठाकले आहेत. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात धरणगाव शहराचा रखडलेला विकास, वाढती गुन्हेगारी, असे मुद्दे केंद्रस्थानी होते. दोन्ही पक्षांच्या वतीने प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. आता मतदारराजा कोणाला पसंती देतो, हे 30 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.