जळगाव - महापालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील छत्रपती शाहू महाराज शासकीय रुग्णालयात आजपासून (दि. 5) सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, पहिल्याच दिवशी योग्य नियोजनाअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रुग्णालयाच्या आवारात शेड उभारणीचे काम अपूर्ण असल्याने ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. दुसरीकडे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्याने रुग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दररोज 200 लोकांना लस देण्याचा दावा ठरला फोल
महापालिकेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. यात 60 वर्षे वयोगटावरील आणि 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. या ठिकाणी दररोज 200 नागरिकांना लस देण्याचे नियोजन असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी योग्य नियोजनाअभावी नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागल्याने महापालिकेचा दावा फोल ठरला.
फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा
रुग्णालयातील लसीकरण केंद्रात नोंदणी, लसीकरण आणि निरीक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक नागरिक लस घेण्यासाठी दाखल झाल्याने गोंधळ उडाला. याठिकाणी गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आल्याने नोंदणी तसेच पडताळणी प्रक्रियेवेळी एकमेकांना जवळजवळ बसवण्यात आले होते. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक जण तोंडावरचा मास्क खाली घेत होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढला तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आहे. दरम्यान, नागरिकांची गर्दी झाली तर त्यावर नियंत्रणासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्या होत्या, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतही अडचणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
नियोजनाच्या बाबतीत प्रशासन म्हणते...
लसीकरण मोहिमेच्या नियोजनात झालेल्या दिरंगाईबाबत महापालिका प्रशासनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की आजपासून लसीकरण सुरू झाल्याने आम्ही पूर्वतयारी केली होती. दररोज 200 लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. परंतु, अपेक्षेपेक्षा अधिक नागरिक लस घ्यायला आले. रुग्णालयाच्या आवारात शेड उभारणी सुरू आहे. त्याचे काम लवकर पूर्ण होईल. तसेच ज्या बाबी निदर्शनास येत आहेत, तशा उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. रावलानी म्हणाले.
अशी आहे जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
कोरोना लसीला केंद्र सरकारने मान्यता प्रदान केल्यानंतर देशभरात एकाच वेळी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही 16 जानेवारीला कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जात आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात 21 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आजअखेर 26 हजार 295 जणांना लसीचा पहिला तर 4 हजार 746 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील केंद्रावर झाले आहे. याठिकाणी आतापर्यंत 2 हजार 785 जणांना लसीचा पहिला तर 649 जणांना दुसरा डोस दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात जेवढे लसीकरण झाले आहे; त्यात सर्वाधिक 70 टक्के लसीकरण हे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना झाले आहे. उर्वरित 30 टक्के लसीकरणात फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची एकूण टक्केवारी 58 ते 60 टक्के इतकी आहे.