जळगाव - कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अतिशय तीव्र आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. तरीही काहींना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोना किती भयावह आहे, याचा प्रत्यय आणणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी कुटुंबातील तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अवघ्या महिनाभराच्या काळातच या परिवाराने सहा आप्तांना गमावले आहे. दरम्यान, या कुटुंबातील एका महिलेचा काल (मंगळवारी) सायंकाळी जळगावात एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, संबंधित रुग्णालयाने हा आरोप फेटाळून लावला.
सावदा येथील परदेशी कुटुंब हे कर्तबगार आणि प्रतिष्ठीत मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह गणपसिंह परदेशी (वय 55) यांचे गेल्या महिन्यात 25 तारखेला कोरोनाचा उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे बंधू किशोरसिंह गणपतसिंह परदेशी (वय 52) आणि त्यांची पत्नी संगीता किशोरसिंह परदेशी (वय 48) यांचे देखील कोरोनाचा उपचार सुरू असताना अनुक्रमे 21 व 25 मार्च रोजी निधन झाले. परदेशी कुटुंबीय या धक्क्यातून सावरत नाही, तोच कैलाससिंह आणि किशोरसिंह परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी यांचे अन्य व्याधीवर उपचार सुरू असताना निधन झाले होते. अवघ्या आठवडाभरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप
यानंतर याच कुटुंबातील राजेंद्रसिंह गणपसिंह परदेशी यांचा कोरोनाने 31 मार्च रोजी मृत्यू झाला. काळाचा घाला एवढ्यावर थांबला नाही. मंगळवारी 27 एप्रिल रोजी याच कुटुंबातील प्रतिभा कैलाससिंह परदेशी यांचाही जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या उपचाराला प्रतिसाद देत होत्या. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
महापौर व उपमहापौरांची हॉस्पिटलला भेट
या घटनेची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हॉस्पिटलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे तणाव निवळला. दरम्यान, एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांचा महिनाभराच्या कालावधीतच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात रुग्णालयाचे संचालक डॉ. मिनाज पटेल म्हणाले की, आमच्याकडे आयसीयूत 70 रुग्ण दाखल आहेत. ऑक्सिजन बंद पडलाच नाही. ऑक्सिजन बंद पडला असता तर इतर रुग्णांना देखील अडचण निर्माण झाली असती. परंतु, ते व्यवस्थित आहेत. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - लॉकडाऊन, मोफत लसीकरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय