जळगाव - दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१० वे वर्ष होते.
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करणारी 'वारी' म्हणजे महाराष्ट्राची प्रमुख ओळख आहे. गेल्या सातशे ते आठशे वर्षांपासून वारीचा अमोघ प्रवाह अविरतपणे वाहतो आहे. चैतन्य, ऊर्जा, उत्साह आणि भक्तीचा संगम म्हणजेच वारी. वारीला कोणी आनंदयात्रा म्हणून तर कोणी पारमार्थिक सहप्रवास म्हणून संबोधित केले आहे. मात्र, वारी म्हणजे खऱ्या अर्थाने माऊलीचा गजर करणारे संमेलन आहे, अशी वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या भाविकांची भावना आहे. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातून संत मुक्ताई संस्थानातर्फे दरवर्षी संत मुक्ताईच्या दिंडीचे आयोजन करण्यात येते. आषाढी एकादशीला पंढरपुरात भरणाऱ्या यात्रे वेळी विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई निघतात, अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. कोथळी गावात असलेल्या मुक्ताईच्या जुन्या मंदिरापासून दिंडीला सुरुवात होते. संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत तब्बल ५६० किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.
संत मुक्ताईच्या दिंडीत महिला भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. दिंडीत सहभागी होण्यासाठी खान्देश, विदर्भासह मराठवाड्यातील भाविक मुक्ताईनगरला येऊन दिंडीत चरण सेवा करतात. गृहसंसार दुसऱ्याच्या हवाली करून महिला भाविक दिंडीत सहभागी होतात. दिंडीत सहभागी होऊन एक अनोखी ऊर्जा अंगात संचारत असल्याची अनुभूती भाविकांना येते. खान्देशातील कोथळी येथून प्रस्थान झाल्यावर मुक्ताई दिंडीचा पंढरपूरकडे जाताना एकूण ३३ दिवसांचा मुक्काम असतो. त्यापैकी सर्वाधिक १२ मुक्काम हे बुलडाणा जिल्ह्यात होतात. ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता दिंडीतील वारकरी संत मुक्ताईच्या सेवेत तल्लीन होऊन जातात.
असे आहे यावर्षीच्या दिंडीचे वेगळेपण
यावर्षी मुक्ताईच्या दिंडीत 'निर्मल वारी, 'हरित वारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुक्ताईची दिंडी ज्या ज्या गावांतून मार्गक्रमण करणार आहे, त्या गावांमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करून या वृक्षांना 'मुक्ताई वृक्ष' ही नावे देण्यात येणार आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे.