जळगाव - कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाही त्याला अपवाद नाहीत. कोरोना काळात कराचा भरणा करण्यासाठी लोक पुढे येत नसल्याने, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्या ग्रामस्थांना विविध सवलती देण्यासह 'सुवर्ण बक्षीस' नावाची एक योजना जाहीर केली आहे. त्यात कराचा भरणा केला तर ग्रामस्थांना एक तोळे सोन्याची चैन, एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथणी, आकर्षक अशी पैठणी आणि बरेच काही मिळणार आहे.
हेही वाचा - जलवाहिनीच्या कामामुळे ४८ कासवांचा मृत्यू, उष्णतेने दगावल्याचा वनविभागाचा दावा
कर वसुली होत नसल्याने लढवली शक्कल
साकेगाव हे साधारणपणे 15 हजार लोकवस्तीचे गाव. येथील ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी सातत्याने अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. परंतु, कोरोना महामारीच्या काळात ग्रामस्थांकडून कराचा भरणा करण्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने विकासकामे करण्यात ग्रामपंचायतीला अडचणींचा सामना करावा लागत होता. शिवाय, पहिल्या लाटेत साकेगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना, गावात विकासकामे करणे, कर्मचाऱ्यांचे पगार देणे, अशा पातळ्यांवर कसरत होत होती. म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने कर वसुलीसाठी काहीतरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. यात सुवर्ण बक्षीस योजनेची संकल्पना पुढे आली.
नेमकी काय आहे योजना व सवलती?
साकेगाव ग्रामपंचायतीने चालू आर्थिक वर्ष 2021-22 चा संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी 5 टक्के सूट जाहीर केली आहे. एवढेच नव्हे तर, संबंधित ग्रामस्थाच्या कुटुंबाला वर्षभर दररोज 20 लीटर मोफत आरोचे फिल्टर पाणी देण्यात येणार आहे. तसेच, 12 ते 31 मे 2021 दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी एक लकी ड्रॉ योजना आखण्यात आली आहे. त्यात पहिले बक्षीस 10 ग्रॅम सोन्याची चैन, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम सोन्याची नथणी, तृतीय बक्षीस 5 पैठणी साड्या, त्याचप्रमाणे 50 पाण्याचे जार (प्रत्येकी एक) उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून कर भरणाऱ्या ग्रामस्थांना वाटप करण्यात येणार आहेत. या शिवाय 10 हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला पाण्याचा 1 जार भेट म्हणून देण्यात येत आहे. 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना करात 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी कर भरणाऱ्या प्रत्येकाला एक डस्टबिन मोफत देण्यात येत आहे. घरातील कचरा या डस्टबिनमध्ये टाकून तो दररोज घंटागाडीत जमा करावा, असे आवाहन केले जात आहे.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती देताना प्रभारी सरपंच आनंद ठाकरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, कोरोनामुळे साकेगाव ग्रामपंचायतीला कर वसुलीच्या कामात अडचणींना सामोरे जावे लागत होते. अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने गावात विकासकामे करताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत करवसुली वाढवावी लागणार होती. करवसुली वाढवण्यावर आम्ही भर देत होतो. यातूनच सुवर्ण बक्षीस योजना पुढे आली. या योजनेला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून अनेक ग्रामस्थ स्वतःहून कर भरण्यास येत आहेत. योजनेच्या कालावधीत आम्ही अपेक्षित करवसुली करू, असा विश्वास सरपंच आनंद ठाकरे यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत साडेचार लाख रुपयांची वसुली
ग्रामपंचायतीने जाहीर केलेली सुवर्ण बक्षीस योजना आणि विविध सवलतींबाबत ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ही योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत साडेचार लाख रुपयांची वसुली झाली आहे. 31 मे पर्यंत साधारणपणे 20 ते 22 लाख रुपयांची करवसुली होईल, असा विश्वास ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार यांनी व्यक्त केला. ही योजना जाहीर केल्यामुळे करवसुलीत मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सुवर्ण बक्षीस योजनेच्या 'लकी ड्रॉ'ची उत्सुकता
31 मे रोजी सुवर्ण बक्षीस योजनेची मुदत संपणार आहे. त्यानंतर 1 जून रोजी 'लकी ड्रॉ' काढण्यात येणार आहे. त्यात कोणाला काय बक्षीस मिळते? याची ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सर्वांचे डोळे एक तोळे सोन्याच्या चैनीकडे लागले आहेत.
हेही वाचा - 'दैव बलवत्तर म्हणून वाचलो', तौक्ते वादळातून बचावलेल्या वैभव पाटीलची थरारक आपबिती