जळगाव - शौचालयांमध्ये घाण असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर सुमारे अडीच तास रोखून धरली. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत रेल्वे प्रशासनाने भुसावळ स्थानकावर शौचालये साफ केल्यानंतर एक्सप्रेस पुढे मार्गस्थ झाली.
हेही वाचा - विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांचा पाहणी दौरा; साफसफाई करता कर्मचाऱ्यांची पळापळ
भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर गाडी क्रमांक 12715 (अमृतसर-नांदेड) सचखंड एक्सप्रेस प्रवाशांनी शौचालयांमध्ये घाण असल्याच्या कारणावरून अडीच तास रोखून ठेवली. गाडीतील शौचालयांमध्ये घाण असल्याने प्रवाशांनी त्याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे केली. तरीदेखील त्याची दखल घेण्यात न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी गाडी रोखून ठेवली व त्याबाबतची तक्रार भुसावळ स्थानकावर देखील केली. मात्र, भुसावळ स्थानकावर देखील सुरुवातीला अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशी संतप्त झाले. शेवटी वाद वाढल्याने प्रशासनाला दखल घ्यावी लागली. सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. शौचालये साफ करण्यात आली. पुढच्या प्रवासात काही अडचण येऊ नये, म्हणून भुसावळ स्थानकावरून 3 ते 4 सफाई कर्मचारी गाडीसोबत रवाना करण्यात आले.
सचखंड एक्सप्रेसमध्ये प्रत्येक बोगीत बायो टॉयलेट आहेत. त्यातील यंत्रणा बिघडल्याने ही समस्या उद्भवल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमृतसरपासून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर दिल्लीपासून ही समस्या निर्माण झाली. त्यानुसार प्रवाशांनी दिल्ली, ग्वालियर येथे तक्रारी केल्या. परंतु, त्याकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. शेवटी सकाळी साडेसहा वाजता गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर मात्र, प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या साऱ्या प्रकारामुळे गाडीला अडीच तासांचा विलंब झाला.