जळगाव - एस. टी. महामंडळाने तीन महिन्यांच्या रखडलेल्या पगारापैकी फक्त एका महिन्याचा पगार दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामंडळाने उर्वरित दोन महिन्यांचेही पगार तातडीने द्यावेत, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी एस.टी. कर्मचाऱ्यांनी जळगाव आगारात आत्मक्लेश आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.
हेही वाचा - मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा; संभाजी ब्रिगेडचे नांदेड-हैदराबाद रस्त्यावर रास्तारोको..
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे सेवा बंद असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होऊन कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने वेतन देण्यात येत आहे. आता तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे वेतन देण्यात आले नव्हते. त्यामुळे इंटक संघटनेतर्फे नुकतेच वेतनाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन करण्यात आले होते. अखेर महामंडळाने तीन महिन्यांपैकी फक्त एकाच महिन्याचे वेतन दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महामंडळ प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र स्टेट एस. टी. कामगार संघटनेचे विनोद शितोळे यांच्यासह योगराज पाटील, सुरेश चांगरे, उदय भोसले, गुलाब शेख, महेश मोरे, दीपक गुरव, कैलास सोनावणे, प्रवीण सोनावणे आदी एस. टी. कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. तसेच, २० दिवसांची सक्तीची रजा रद्द करावी, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनची रजा मिळावी, आदी मागण्याही यावेळी आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.
हेही वाचा - नायगावमध्ये हायप्रोफाइल संकुलात तुफान हाणामारी... महिलांंमध्येही खडाजंगी!