जळगाव - टाळेबंदीचा गैरफायदा घेत परप्रांतात जाणार्या रेल्वे गाड्यांची तिकिटे काढून त्यांची जास्त किमतीने विक्री करणार्या 44 दलालांना अटक करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 8 लाख 62 हजार 191 रुपये किंमतीची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेल्वे सेवा बंद आहे. असे असले तरी परप्रांतीय प्रवाशांसाठी मात्र, 12 मे 2020 पासून 15 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 1 जूनपासून निवडक विशेष रेल्वे आणि एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येत आहेत. ही संधी साधून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत.
काही दलालांनी वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटे काढले आहेत. अशा आरक्षित तिकीटांची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने धडक मोहिम राबविली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. टाळेबंदी आणि टाळेबंदी खुली होतानाच्या कालावधीत छाप्यांत सर्व मिळून 44 दलालांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 8 लाख 62 हजार 191 किंमतीची 479 ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, दलालांच्या माध्यमातून तिकिटे खरेदी करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. या माध्यमातून दलाल फसवणूक करू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सेंटरवरूनच तिकिटे खरेदी करावीत, असे रेल्वे सुरक्षा बलाने आवाहन केले आहे.