जळगाव - करोना पाॅझिटिव्ह महिलेचा निलकमल रुग्णालयात ११ ऑक्टोबर दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, वेळेवर व्हेन्टीलेटर लावले नाही, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा अरोप करत तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. तोडफोडीत रुग्णालयाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्ररकणी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन जमावाच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत महिलेला २९ सप्टेंबरपासून रुग्णालयात अॅडमिट केले होते. त्यांना निमोनिया व कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होती. त्यानुसार त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांचा मृत्यू झाल्यांनतर लागलीच डॉ. मनोजकुमार टोके यांनी त्यांच्या मुलासह नातेवाईकांना दालनात बोलावुन घटनेची माहिती दिली. यानंतर मृत महिलेच्या मुलासह पाच-सहा नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. आयसीयू व डॉक्टरांच्या दालनाचा दरवाजा तोडला. आयसीयूमधील कर्मचारी पवन बिरारी यांना मारहाण केली. तसेच इतर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणारे पॅनल तोडण्याचा प्रयत्न केला. काऊंटरजवळ एका महिलेने खुर्ची फेकली. यात रुग्णालयाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच ९२ हजार ७४६ रुपयांचे बील अदा न करताच नातेवाईक रुग्णालयातून निघुन गेले.
या प्रकरणी डॉ. टोके यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मृत महिलेच्या मुलासह अनोळखी पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे तपास करत आहेत. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांनी देखील निलकमल हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉक्टरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.